तुळजापूर (प्रतिनिधी)- स्त्री शक्तीचे आराध्यस्थान असलेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरीत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापनदिनानिमित्त नगरपरिषदेने महिला सन्मान आणि महिला सक्षमीकरणाचा आगळावेगळा संदेश दिला. नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी स्वतः ध्वजारोहण न करता नगरपरिषदेत सलग तीन टर्म निवडून आलेल्या महिला नगरसेविका सौ. अश्विनीताई विशाल रोचकरी यांना ध्वजारोहणाचा मान दिला.
नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या या निर्णयातून महिलांना नेतृत्वाची संधी देण्याचा संदेश देण्यात आला. नगरपरिषदेच्या इतिहासात महिला लोकप्रतिनिधीचा अशा पद्धतीने सन्मान करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.
यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगरसेविका प्रगतीताई गोपाळ लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास नगराध्यक्ष विनोद गंगणे, माजी मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, उपनगराध्यक्ष रामचंद्र आबा रोचकरी, गटनेते औदुंबर दादा कदम, विरोधी पक्षनेते अमोल भैय्या कुतवळ, ज्येष्ठ नगरसेवक पंडितराव जगदाळे, विजय आबा कंदले, विशाल रोचकरी, सरोजा अमृतराव, जयश्री भ. कंदले, ज्योतीताई सावंत यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी, माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील विविध ठिकाणीही ध्वजारोहण
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त तुळजापूर तहसील कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने राजे शहाजी महाद्वार येथे प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार माया माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पंचायत समिती तुळजापूर येथे सभापती विक्रमसिंह देशमुख, नवोदय विद्यालयात प्राचार्य अनिल कांबळे, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा. डॉ. ओमप्रकाश रांजणकर, सैनिक शाळेत मुख्याध्यापक चंद्रकांत घोडके, तर खरेदी-विक्री संघ येथे चेअरमन अनिता श्रीकांतराव वाघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने शहरातील विविध शासकीय, निमशासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
