तुळजापूर (प्रतिनिधी)- पावसाने प्रदीर्घ काळ ओढ दिल्याने तुळजापूर तालुक्यात यंदा दुष्काळाचे गंभीर सावट निर्माण झाले आहे. अर्धा पावसाळा संपत आला तरी दमदार पावसाने पाठ फिरवल्याने नदी-नाले, बंधारे आणि लघू प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास 1972 च्या दुष्काळापेक्षाही गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

तालुक्यातील 34 लघू व साठवण प्रकल्पांपैकी तब्बल 26 प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला आहे. एकूण उपयुक्त साठ्याच्या केवळ 2.83 टक्के पाणी शिल्लक असल्याने शेतीबरोबरच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे आहेत.


पिके हातची गेली; उभ्या सोयाबीनवर रोटर!

तालुक्यात यंदा खरीपासाठी 1 लाख 12 हजार 89 हेक्टर क्षेत्र अपेक्षित होते. त्यापैकी 1 लाख 9 हजार 323 हेक्टरवर पेरणी झाल्याची आकडेवारी आहे. म्हणजेच 97.53 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. मात्र पेरणीनंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने अनेक भागांत पिकांची अवस्था बिकट झाली आहे.

विशेषतः सोयाबीनची पेरणी 99 हजार 929 हेक्टरवर झाली असून, हे सरासरी क्षेत्राच्या 114.47 टक्के आहे. मात्र आता पावसाअभावी याच सोयाबीनवर संकट कोसळले आहे. काही शेतकरी उभ्या पिकात रोटर नांगर फिरवत आहेत, तर काही ठिकाणी पिके जनावरांना खाण्यासाठी सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.


‌‘पंचनामा कशाला?' शेतकऱ्यांचा सवाल

शासनाच्या यंत्रणेकडून पीक नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी, नुकसानीच्या टक्केवारीवरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. काही गावांत प्रत्यक्षात 80 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले असताना पाहणीमध्ये 50 ते 60 टक्के नुकसान दाखविल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. ‌‘पाऊसच नाही, पीकच नाही; मग पंचनामा कशासाठी?' असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. हिरवेगार दिसणारे शेत काही दिवसांतच करपून गेले असून, सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरले नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाचा आणि उत्पादन घटण्याचा दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे.


तुळजापूरच्या पाण्याचीही चिंता

तीर्थक्षेत्र तुळजापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नळदुर्ग येथील बोरी धरणात अवघा नऊ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा साठाही आगामी काळात कमी होत गेल्यास उन्हाळ्यात तुळजापूरसह परिसरातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती केवळ शेतीपुरती मर्यादित न राहता पिण्याच्या पाण्याचे संकटही उभे करू शकते.


विरोधक आक्रमक; आंदोलनांची मालिकाच

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्ता रोकोसह विविध आंदोलने केली आहेत. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसकडूनही शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दुष्काळ जाहीर करावा, पीक नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करावी आणि बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी आंदोलनांमधून पुढे येत आहे.

 
Top