उमरगा (प्रतिनिधी)- ठाणे जिल्ह्यातील मीरा - भाईंदर येथे दि. 26 व 27 सप्टेंबर 2026 रोजी पार पडलेल्या 13 व्या राज्यस्तरीय तेंग सू डो अजिंक्यपद स्पर्धेत अमन स्पोर्ट्स क्लब, उमरगा येथील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल 14 पदकांची कमाई केली. या दमदार कामगिरीच्या जोरावर धाराशिव जिल्ह्याच्या संघाने महाराष्ट्राची रनर-अप ट्रॉफी पटकावली.
या राज्यस्तरीय स्पर्धेत अमन स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत उत्कृष्ट कौशल्य, आत्मविश्वास, शिस्त आणि जिद्दीचे दर्शन घडविले. खेळाडूंनी 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य, अशी एकूण 14 पदके मिळवत उमरगा तसेच धाराशिव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली. 11 वर्षांखालील मुले हृषभ रामहरी चाटे रौप्यपदक, अर्विन जगन्नाथ पाटील कांस्यपदक, सम्यक विष्णू कांबळे रौप्यपदक, 11 वर्षांखालील मुली, शिवानी राजाराम माने सुवर्णपदक, 14 वर्षांखालील मुले श्रीपती गणपती सोनटक्के रौप्यपदक, नारायण खंडू अंबुलगे रौप्यपदक, स्वराचंद्र विशाल सूर्यवंशी सुवर्णपदक, अनुज विक्रम सूर्यवंशी सुवर्णपदक, धिरज लक्ष्मण पवार सुवर्णपदक, 14 वर्षांखालील मुली, सावनी शिवराज कांबळे कांस्यपदक, अंकिता बसवराज इजमले रौप्यपदक, 18 वर्षांखालील मुले, साहिल महंमदरफी शेख सुवर्णपदक, सुमित सचिन पवार कांस्यपदक, 18 वर्षांखालील मुली मानवी अमित कांबळे यांना कांस्यपदक मिळाले.
खेळाडूंच्या या यशामागे तेंग सू डो स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष रॉकी सर व महासचिव सुभाष मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच तेंग सू डो स्पोर्ट्स असोसिएशन, धाराशिव जिल्हाध्यक्ष महंमदरफी शेख, राज्य पंच श्रेयशी शिंदे, टीम मॅनेजर लक्ष्मण पवार तसेच पालक प्रतिनिधी राजाराम माने व सूर्यवंशी ताई यांच्या सहकार्याने खेळाडूंनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
