परंडा (प्रतिनिधी)- ऐतिहासिक वारसा लाभलेल्या परंडा येथील भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी ऐतिहासिक परंडा किल्ल्यास भेट देऊन पाहणी केली.
यावेळी अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी किल्ल्याच्या विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. किल्ल्यातील ऐतिहासिक वास्तू, मस्जिद , महादेव मंदिर, नृसिंह मंदिर, दारुगोळा साठवणूक व्यवस्था, जुनी विहीर, भांडार तसेच किल्ल्याभोवतालचा खंदक परिसर आणि झाडी-झुडपे यांची पाहणी करण्यात आली. किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करताना त्याचे मूळ ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
किल्ल्याच्या संवर्धनासाठी आतापर्यंत शासनाकडून किती निधी प्राप्त झाला, त्यातून कोणती कामे करण्यात आली, करण्यात आलेल्या कामांचा विनियोग कशा पद्धतीने करण्यात आला, तसेच यापुढे कोणती कामे प्राधान्याने हाती घेणे आवश्यक आहे, याबाबत संबंधितांकडून अध्यक्षांनी माहिती घेतली.
किल्ल्यांच्या सर्वांगीण संवर्धनासाठी अंदाजे 10 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या निधीतून किल्ल्याच्या संरक्षण भिंती, वास्तू, परिसर स्वच्छता, खंदक तसेच अन्य ऐतिहासिक घटकांच्या संवर्धनासाठी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्याचे अधिक भक्कम व मजबूत स्वरूपात संवर्धन करण्यासाठी प्राप्त निधीचा योग्य व नियोजनबद्ध वापर करण्यात यावा, अशा सूचना अर्चनाताई पाटील यांनी दिल्या.
परंडा किल्ला हा धाराशिव जिल्ह्याच्या ऐतिहासिक वैभवाचा महत्त्वपूर्ण ठेवा असून, या ऐतिहासिक वास्तूचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या निधीतून किल्ल्याच्या संवर्धनाची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा परिषद धाराशिवचे कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे, सार्वजनिक बांधकाम व मागासवर्गीय कल्याण सभापती तथा परंडा नगरपालिकेच्या नगरसेविका रत्नमाला राहुल बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, प्रवीण शिंदे, युवा नेते, किल्लेदार मयूर डाके, अभिजीत बनसोडे तसेच संबंधित अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
