धाराशिव (प्रतिनिधी)- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोगचिकित्सा विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आपल्या महायुती सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बालरुग्णांसाठी अत्याधुनिक ‘मॉड्युलर पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट'उभारण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व साधनसामग्री खरेदीस 8 कोटी 55 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर आजारांनी बाधित बालरुग्णांना अधिक प्रगत आणि दर्जेदार अतिदक्षता उपचाराची सुविधा आता धाराशिवमध्येच उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने 31 ऑगस्ट 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षात राज्य योजनेंतर्गत उपलब्ध अनुदानातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बालरोगचिकित्सा विभागासाठी यंत्रसामग्री खरेदी केली जाणार आहे. शासन निर्णयानुसार ‘मॉड्युलर पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट ऑन टर्न की' या एकाच युनिटसाठी 8 कोटी 55 लाख 5 हजार 244 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचे बळकटीकरण आणि श्रेणीवर्धन तसेच यंत्रसामग्रीसाठीच्या तरतुदीतून या खर्चाची पूर्तता केली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागाच्या उपचार क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. बालरुग्णांच्या उपचारांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा असून, धाराशिवच्या आरोग्य व्यवस्थेला त्यामुळे आणखी बळकटी मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
