धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिली आहे. परिणामी जिल्ह्यातील पिकांची अवस्था चिंताजनक बनली आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ 29 टक्के पाऊस झाला असून, जून ते ऑगस्ट या कालावधीत सरासरीच्या 73 टक्केच पर्जन्यमान नोंदवले गेले आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये मागील 15 ते 30 दिवसांपासून पावसाचा सलग खंड पडल्याने पिकांवर पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. परिणामी जिल्ह्यात जवळपास 50 ते 60 टक्के पिके सुकण्याची शक्यता असून, खरीप उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. अशावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तातडीने शास्त्रीय पद्धतीने पीक पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करण्याची सूचना आपण जिल्हाधिकाऱ्यांना केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोमवारी 31 ऑगस्ट रोजी याबाबत पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ 29 टक्के पाऊस झाला आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीतही सरासरीच्या केवळ 73 टक्के पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच कालावधीत सरासरीपेक्षा 21 टक्के अधिक पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा सरासरीच्या 27 टक्के कमी पाऊस झाला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, अनेक भागांत पिकांना पाण्याचा ताण जाणवत आहे. पावसातील दीर्घ खंडामुळे पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भावही वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याबरोबरच अपेक्षित उत्पादन मिळविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
सध्याची परिस्थिती पाहता खरीप हंगामातील उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे केवळ पर्जन्यमानाच्या आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतातील पिकांची स्थिती जाणून घेणे आवश्यक असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
