धाराशिव (प्रतिनिधी)- भटक्या-विमुक्त समाजाची संस्कृती,जीवनमूल्ये आणि परंपरांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने सोमवारी (दि.31) धाराशिव येथे ‘भटके विमुक्त दिन' विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि माहितीपर उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यानिमित्त विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाने 31 ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘भटके विमुक्त दिवस' म्हणून साजरा करून त्या दिवशी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्कृती आणि जीवनमूल्यांचे दर्शन
भटक्या-विमुक्त समाजाची संस्कृती, जीवनमूल्ये आणि परंपरांचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक,शैक्षणिक व माहितीपर उपक्रम यानिमित्त राबविण्यात आले.आश्रमशाळांमध्ये शालेय स्तरावर विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिरासह चित्रकला आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जिल्हास्तरीय कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सुपनार प्रमुख वक्ते होते. अशासकीय सदस्य पप्पू काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला राम जवान आणि हनमंत वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजसुधारकांच्या कार्याचा जागर
कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी भटक्या-विमुक्त समाजातील थोर समाजसुधारकांच्या जीवनावर आधारित विचार मांडले.त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा आणि समाजाच्या जडणघडणीतील योगदानाची माहिती उपस्थितांना देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण अमोल ताकभाते यांनी केले.इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी किरण बेंडगे यांनी आभार मानले.
200 ते 250 विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग
जिल्ह्यातील जवळपास 200 ते 250 विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.जिल्हास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपातील बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भटक्या-विमुक्त समाजाची संस्कृती,परंपरा,जीवनमूल्ये आणि समाजसुधारकांचे योगदान जाणून घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण, धाराशिव कार्यालयातील निरीक्षक युवराज भोसले,संदेश घुगे,वरिष्ठ लिपिक विकास राठोड यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.