भुम (प्रतिनिधी)-  तालुकास्तरीय विज्ञान नाटिका व वक्तृत्व स्पर्धेत रविंद्र हायस्कूल, भूम येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विज्ञान नाटिका स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून, वक्तृत्व स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी प्रणव शेटे यानेही तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले आहे.

विज्ञान नाटिका स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थी

राजलक्ष्मी बोराडे, वैष्णवी जानकर, अनुष्का कुंभार, दिव्या सातपुते, समृद्धी कांबळे, सिद्धी सोळंके, कृष्णा शेळके,  शौर्य वाघमारे,

नाटिकेसाठी ‌‘विज्ञान आणि समाज' हा विषय निवडला होता. त्यामध्ये ‌‘कृत्रिम बुद्धिमत्ता  मित्र, साधन की धोका?' या उपविषयावर विद्यार्थ्यांनी प्रभावी विज्ञान नाटिका सादर केली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा दैनंदिन जीवनातील वाढता वापर, त्याचे फायदे, संभाव्य धोके तसेच तंत्रज्ञानाचा जबाबदारीने आणि विवेकपूर्ण वापर करण्याची गरज या विविध बाबींवर विद्यार्थ्यांनी आपल्या नाटिकेतून प्रभावीपणे प्रकाश टाकला.

विद्यार्थ्यांनी केलेले उत्कृष्ट अभिनय, प्रभावी संवादफेक, विषयाची मांडणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळे नाटिकेला परीक्षकांची विशेष दाद मिळाली. विद्यार्थ्यांच्या कल्पक व दर्जेदार सादरीकरणामुळे रविंद्र हायस्कूलने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.

याचबरोबर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत रवींद्र हायस्कूलचा विद्यार्थी प्रणव शेटे यानेही आपल्या प्रभावी वक्तृत्वातून परीक्षकांची मने जिंकत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला. विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, प्रभावी आवाजातील चढ-उतार आणि विचारांची स्पष्टता यामुळे प्रणव शेटे याने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती. प्रभा अंधारे, अर्चना दळवी यांचाही मोठा वाटा आहे. तालुकास्तरावर मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विज्ञान नाटिका आणि वक्तृत्व स्पर्धेत मिळालेल्या या दुहेरी प्रथम क्रमांकामुळे रविंद्र हायस्कूल, भूमच्या शैक्षणिक व सांस्कृतिक गुणवत्तेची पुन्हा एकदा उज्ज्वल छाप उमटली आहे. या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभास संस्थेचे सचिव आर.डी.सूळ, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे, रवींद्र प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक लक्ष्मण देशमुख शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top