धाराशिव (प्रतिनिधी)- विधिज्ञांनी जबाबदारी व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावावे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी केले. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाच्या तुळजापूर येथील न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन रविवारी 6 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांच्या हस्ते आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश अभीश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाले. त्या प्रसंगी न्यायमुर्ती ब्रह्मे बोलत होते.
यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश खोमणे, महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.मिलिंद थोबडे, तुळजापूर विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.जयवंत इंगळे यांच्यासह न्यायव्यवस्थेतील मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी न्यायमूर्ती ब्रह्मे म्हणाले की, पक्षकार आणि वकिलांसाठी न्यायालयात आवश्यक त्या सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा सर्वांनी योग्य पद्धतीने लाभ घ्यावा. विधिज्ञांनी न्यायालयीन कामकाज करताना आपली जबाबदारी आणि प्रामाणिकपणा जपत कर्तव्य पार पाडावे असे न्यायमुर्ती ब्रह्मे यांनी सांगितले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश अभीश्री देव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मिलिंद थोबडे यांनी तुळजापूर बार असोसिएशनचे विशेष कौतुक केले. प्रास्ताविक ॲड.जयवंत इंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य न्यायदंडाधिकारी प्रज्ञा मेढे यांनी केले. तर अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश खोमणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बार असोसिएशनच्या पदाधिकारी ॲड. अंजली साबळे, सचिव शैलेश पाठक,सहसचिव ॲड. फुटाणकर,कोषाध्यक्ष ॲड. सपकाळ यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
