परंडा (प्रतिनिधी)-परंडा शहरातील कुऱ्हाड गल्ली येथील संत सेना महाराज विठ्ठल मंदिरात संत सेना महाराज जयंती मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक, नाभिक समाज बांधव, समाजसेवक, उद्योजक, डॉक्टर, वकील तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत सेना महाराज हे केवळ वारकरी संत नव्हते, तर कष्ट, प्रामाणिकपणा, सेवा, भक्ती, समता आणि कर्तव्यनिष्ठ जीवनाचा आदर्श देणारे संत होते. त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळत विठ्ठलभक्ती केली. त्यामुळे संत सेना महाराजांची संतपरंपरा ही गृहस्थाश्रमाचा त्याग करण्यापेक्षा गृहस्थाश्रमात राहून आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडत ईश्वरभक्ती आणि समाजसेवा करण्याची प्रेरणा देणारी आहे.
आजच्या काळात तरुण पिढीसमोर व्यसनाधीनता, तणाव, सोशल मीडिया, चुकीची संगत आणि दिशाहीनता यांसारखी अनेक आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत संत सेना महाराजांच्या जीवनातील श्रम, संयम, भक्ती, प्रामाणिक व्यवसाय आणि कर्तव्यनिष्ठा हे युवकांसाठी दिशादर्शक ठरू शकतात.
व्यसनमुक्त युवक म्हणजे सक्षम कुटुंब आणि व्यसनमुक्त कुटुंब म्हणजे सक्षम समाज. त्यामुळे संतांच्या विचारांना केवळ मंदिरापुरते मर्यादित न ठेवता ते युवकांच्या आचरणात आणणे हीच खरी संतसेवा ठरेल, असा संदेश यावेळी देण्यात आला.
आज कुटुंबव्यवस्थेवर विविध प्रकारचे ताण निर्माण होत असताना संत सेना महाराजांचा हा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. कुटुंब मजबूत असेल तर समाज मजबूत होतो आणि समाज मजबूत असेल तर राष्ट्र मजबूत होते.
समाजाला एकत्र बांधण्याची संतपरंपरेची शिकवण
संतपरंपरेने जात-पात, उच्च-नीच, श्रीमंत-गरीब यापलीकडे जाऊन मानवतेला केंद्रस्थानी ठेवण्याचा संदेश दिला. संत सेना महाराजांच्या जीवनातून श्रमाला प्रतिष्ठा, व्यवसायाला सन्मान आणि भक्तीला सामाजिक बांधिलकी जोडण्याची प्रेरणा मिळते. म्हणूनच संत जयंती ही केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा सामाजिक संवाद आणि आत्मपरीक्षणाचा दिवस ठरावा,अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमास शिवसेनेचे युवा नेते विश्वजीत ज्ञानेश्वर पाटील, नगरसेवक अनिल शिंदे यांच्यासह नाभिक समाजातील तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजसेवक, उद्योजक, डॉक्टर, वकील आणि विविध क्षेत्रांत कार्यरत मान्यवरांनी उपस्थित राहून संत सेना महाराजांच्या कार्याला अभिवादन केले व आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी नागेश काशीद, संतोष डाके, संतोष भालेकर, सचिन भालेकर,नागेश यादव,दीपक डाके, नागेश डाके, प्रदीप भालेकर, सूरज काळे,धीरज काळे,
लक्ष्मण वाघमारे, गणेश जमदाडे, अंकुश जमदाडे,पृथ्वीराज डाके, सागर भालेकर यांच्यासह समाजातील अनेक नागरिक व परिवार उपस्थित होते.
