तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर-अक्कलकोट मार्गावरील नांदुरी परिसरात मागील महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अल्पशा पावसावर पेरलेले सोयाबीन पीक फुलोऱ्यात येऊन शेंगा लागण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने दडी मारली. त्यामुळे परिसरातील सोयाबीन पिकाचे तब्बल 50 ते 70 टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे चित्र शेतशिवारात दिसून येत आहे. यंदाचा दुष्काळ कठीण जाणार आहे कारण खायला अन्न मिळेल पण प्यायला पाणी मिळणे कठीण असणार आहे
यंदा सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची परीक्षा घेतली. उशिराने आणि अत्यल्प पाऊस झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उसनवारी करून खरीप हंगामाची तयारी केली. नांगरणी, वखरणी, बियाणे, खत आणि पेरणी यासाठी एकरी सुमारे 10 ते 15 हजार रुपये खर्च केला. त्यानंतर कष्टाने पिके जगविली. सोयाबीनने तग धरत फुलोरा धरला आणि काही शेतांमध्ये शेंगाही लागण्यास सुरुवात झाली. मात्र, ऐन फुलोरा व शेंगा भरण्याच्या काळात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांच्या सर्व आशांवर पाणी फिरले आहे.
फुले गळाली, शेंगांत दाणेच नाहीत
पंधरा ते वीस दिवसांहून अधिक काळ पाऊस न पडल्याने फुलोऱ्यातील सोयाबीनची फुले गळून पडली आहेत. ज्या झाडांना शेंगा लागल्या आहेत, त्या शेंगांमध्ये पुरेसा दाणा भरलेला नाही. काही ठिकाणी तर सोयाबीनची झाडे पूर्णपणे वाळून गेली आहेत. त्यामुळे पीक डोळ्यांसमोर करपताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पाऊस आला तरी आता उपयोग नाही!
आता पाऊस झाला तरी हातातून गेलेले पीक पुन्हा उभे राहण्याची शक्यता अत्यल्प आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक तोट्याचा ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. सणासुदीच्या तोंडावर शेतीतून चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी आता निराशा पडली आहे. नांदुरी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, पावसाने प्रदीर्घ उघडीप दिल्याने खर्च केलेला पैसा, श्रम आणि संपूर्ण हंगाम धोक्यात आला आहे. कर्जाचा बोजा कायम असताना उत्पन्न मात्र हातातून जाणार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
शासनाने तातडीने पंचनामे करावेत
पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणताही विलंब न करता शेतशिवारातील पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच नांदुरीसह परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
