धाराशिव  (प्रतिनिधी)-  भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार जिल्ह्यातील 1 हजार 520 मतदान केंद्रांवर एकूण 12 लाख 32 हजार 319 मतदार आहेत. दरम्यान,गणक प्रपत्र प्राप्त न झाल्याने 1 लाख 81 हजार 545 मतदारांना वगळले म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे.

प्रारूप यादीतील मतदारांनी आपले नाव व तपशील तपासून आवश्यक असल्यास निर्धारित मुदतीत दावा,हरकत अथवा दुरुस्तीसाठी अर्ज करावा,असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.भारत निवडणूक आयोग,नवी दिल्ली यांच्या 14 मे 2026 रोजीच्या पत्रानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 घोषित करण्यात आला आहे.या कार्यक्रमांतर्गत सोमवार, दि.31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. जिल्ह्यात 6 लाख 52 हजार 433 पुरुष मतदार,5 लाख 79 हजार 860 स्त्री मतदार आणि 26 इतर मतदार,असे एकूण 12 लाख 32 हजार 319 मतदार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.


18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना फॉर्म-6 द्वारे नोंदणी

मतदार यादी तयार करण्यासाठी 1 ऑक्टोबर 2026 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे.या अर्हता दिनांकापर्यंत 18 वर्षे वय पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना फॉर्म-6 भरून मतदार यादीत नवीन नाव नोंदविता येणार आहे. मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठी फॉर्म-7,तर मतदाराच्या माहितीमध्ये दुरुस्ती करणे अथवा स्थलांतरासाठी फॉर्म-8 संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सादर करता येणार आहे.


निर्णयाविरोधात 15 दिवसांत अपील

मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दावा किंवा हरकतीवर दिलेल्या निर्णयाशी मतदार अथवा नागरिक असहमत असल्यास संबंधित आदेशाच्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे अपील दाखल करता येणार आहे.


 
Top