कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरात खवा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला पोलिसांनी विनाकारण त्रास दिल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकारामुळे व्यापारी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. बुधवार, दि. 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास गंगाखेडच्या दिशेने खवा घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला कळंब पोलिसांनी अडवून पोलीस ठाण्याजवळ उभे केले. त्यानंतर वाहन सोडण्यासाठी आर्थिक व्यवहाराची बोलणी सुरू झाल्याचा आरोप संबंधित व्यापाऱ्याने केला आहे.

व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला मोठ्या रकमेपासून सुरू झालेली कथित मागणी अखेर पाच हजार रुपयांपर्यंत आल्याचे सांगण्यात आले. मात्र, याचदरम्यान संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पोलिसांना फोन आला. ‌‘तुम्हाला ही गाडी पकडण्याचा अधिकार आहे का?' असा थेट सवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.


‌‘पंधरा दिवसांपासून तपासणी सुरू आहे; दोषी असतील तर कारवाई करा'

संबंधित अधिकाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून खवा व्यापाऱ्यांच्या मालाची तपासणी सुरू असल्याचे सांगितल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले. तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून, नियमांचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नये, अशी सूचना पोलिसांना करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

यानंतर पोलिसांनी वाहन सोडून देत ‌‘तुमची गाडी घेऊन जा, यापुढे कुठेही अडवणार नाही', असे सांगितल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कळंब शहरात चर्चेला उधाण आले आहे.


पोलिसांचे काम काय? व्यापाऱ्यांना दमदाटी की कायदा-सुव्यवस्था?

कळंब शहरात अवैध धंदे, गुटखा विक्री, वाळू उपसा आदींबाबत नागरिकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असताना, दुसरीकडे छोट्या व्यापाऱ्यांना अडवून त्रास दिला जात असल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी सर्वसामान्य व्यापाऱ्यांच्या मागे लागल्याचा आरोप व्यापारी वर्गातून करण्यात येत आहे.

‌‘तुकाराम मुंडे यांच्या नावाचा धाक दाखवून व्यापारी, हॉटेलचालक व छोट्या व्यावसायिकांना दमदाटी केली जात असल्यास त्याची वरिष्ठ पातळीवर चौकशी झाली पाहिजे,' अशी मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे.


व्यापाऱ्यांचा इशारा : त्रास थांबला नाही तर आंदोलन!

खवा व्यापाऱ्यांना अशा प्रकारे वारंवार त्रास दिल्यास यापुढे गप्प बसणार नसल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. संबंधित पोलिसांच्या वर्तनाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोष आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ‌‘आम्हाला विनाकारण त्रास देणे थांबवावे. अन्यथा आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन दाद मागू आणि गरज पडल्यास आंदोलन करू,' असा इशारा खवा व्यापाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

दरम्यान, या घटनेतील आर्थिक व्यवहाराच्या आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असून, पोलिसांची बाजूही समोर येणे महत्त्वाचे आहे. या प्रकरणामुळे कळंब पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ अधिकारी याप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.


 
Top