धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 78 वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ ए.के मंजुळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तसेच मुक्तीसंग्राम लढ्याचे प्रमुख सूत्रधार स्वामी रामानंद तीर्थ आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सुप्रसिद्ध वक्ते डॉ बालाजी गुंड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन केले, ते म्हणाले की, धाराशिव जिल्हा हा अध्यात्मिक वारसा असलेला जिल्हा आहे,संत गोरोबाकाका,आई तुळजाभवानी यांचे पवित्र स्थान या जिल्ह्याला लाभले आहे. पण मराठवाड्याने जुलमी रझाकाराचे दिवस पाहिलेले आहेत, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड, बीड,आदी ठिकाणांवरुन स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्तीसंग्रामाचा लढा सुरू होता. देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील आपण संस्थानांमध्ये विखुरलेले होतो. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान याचे राज्य होते. निजाम राजवटीतुन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी आपली माणसं झुंजत होते. निजामाचा सेनापती कासीम रिझवी याने अत्याचाऱ्याची परिसिमा ओलांडली होती, गोविंदभाई श्रॉफ, चंद्रशेखर वाजपेयी,रविनारायण रेड्डी, हुतात्मा गोविंद पानसरे, बाबासाहेब परांजपे, हरिश्चंद्र जाधव ,शूर विरांगणा दगडाबाई शेळके, जनार्दन होर्टिकर अशा अनेक लोकांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली.स्वामी रामानंद तिर्थानी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना सत्य परिस्थिती सांगितली, त्यावेळी सरदार पटेलांनी निर्वाणीचा निर्णय घेतला आणि पोलीस ऍक्शन घेतली.शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादच्या सेनापती अल इद्रिस याने शरणागती पत्करली व मराठवाड्यात तिरंगा स्वाभीमानाने फडकवला गेला.मराठवाडा देशाचा एक मजबूत भाग मानला जातो,या इतिहासाची जाणीव आपण सदोदित ठेवणे गरजेचे असल्याचे मत डॉ गुंड यांनी व्यक्त केले.प्राचार्य डॉ. मंजुळकर अध्यक्षीय समारोपात म्हणाले की, इतिहास केवळ संघर्षाचाच नसुन उर्जेचा सुद्धा असतो,इतिहासातुन भविष्याचा अचूक वेध घेता येतो, नव्या पिढिने मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास समजून घ्यावा,कारण समाज एकत्र आल्यावरच सामाजिक क्रांती घडत असते, युद्ध, संघर्ष करणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात असतो ही जाणीव आजच्या पिढीने लक्षात ठेवावी असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा. माधव उगिले यांनी केले तर आभार प्रा घुले यांनी मानले.मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ मदनसिंग गोलवाल यांच्या पुढाकाराने मुक्तीसंग्राम लढ्यावर आधारित भित्तिपत्रिका आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामावर आधारित दुर्मिळ ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले.या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन प्राचार्य डॉ मंजुळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

