धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथे संस्थेचे विश्वस्त मल्हार दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या वैचारिक व्याख्यानमालेची परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवण्यात आली आहे. भक्ती, संस्कृती, तांत्रिक आणि सामाजिक जाणिवांची सांगड घालत महाविद्यालयात सलग सात दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळत आहे.

गणेशोत्सवानिमित्त महाविद्यालयात दररोज सकाळी आणि सायंकाळी गणरायाची आरती मोठ्या उत्साहात होत आहे. आरतीनंतर विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन मिळत असल्याने यंदाचा गणेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी केवळ धार्मिक उत्सव न राहता ज्ञान, विचार आणि सामाजिक जाणीव जागृत करणारा उत्सव ठरत आहे.

यावर्षीच्या गणेशोत्सवातील आरतीसाठी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय कीर्ती किरण पुजार, तेरणा परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक रेवनसिद्ध अप्पा लामतुरे, तेरणा ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांची विशेष उपस्थिती लाभली.

यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या भविष्यातील वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. “अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर समाधान न मानता बदलत्या काळातील तंत्रज्ञान, कौशल्ये, नव्या संधी आणि सामाजिक जबाबदारी यांचा विचार करून स्वतःची सर्वांगीण प्रगती साधावी,“ असा संदेश त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत चालविण्यात येणाऱ्या ड्रोन सेंटर आणि एप्पल लॅब चा विशेष उल्लेख करून या उपक्रमशीलतेचे कौतुक केले. तसेच गणेशोत्सवानिमित्त आयोजित पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविणाऱ्या विद्यार्थ्यांचेही त्यांनी भरभरून कौतुक केले.

व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी पोलीस निरीक्षक दराडे यांनी विद्यार्थ्यांना विविध कायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली. दैनंदिन जीवनात कायद्याचे महत्त्व, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये तसेच विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती का करून घेतली पाहिजे, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबी अत्यंत सहज आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगितल्या.

दुसऱ्या दिवशी सहाय्यक संचालक अमोल ताकभाते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन केले. तर तिसऱ्या दिवशी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अशोकभाऊ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच याच दिवशी उपस्थित असलेले ह भ प अनसुर्डीकर  महाराज आणि प्रतिभाताई अनसुर्डीकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अनसुर्डीकर महाराज म्हणाले की विद्यार्थी विविध तंत्रज्ञान शिकत असून त्यांनी त्या तंत्रज्ञानातील बाप  बनले पाहिजे. विविध क्षेत्रातील मान्यवरांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद घडवून आणण्याच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पलीकडील व्यापक जग समजून घेण्याची संधी मिळत आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी गणेशोत्सवाच्या या उपक्रमाबाबत बोलताना सांगितले, “गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सद्भावना, सामाजिक जाणीव आणि एकोपा वाढीस लागावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडताना समाजाला एकत्र आणण्याबरोबरच जनजागृती आणि सामाजिक प्रबोधनाला महत्त्व दिले होते. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मिळून हा गणेशोत्सव साजरा करीत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे.“

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या वैचारिक व्याख्यानमालेमुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील तज्ज्ञांचे विचार ऐकण्याची संधी मिळत असून, त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. ‌‘भक्तीसोबत विचार आणि उत्सवासोबत प्रबोधन' या संकल्पनेतून साकारलेला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा गणेशोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरत आहे.

सलग सात दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले असून, पुढील दिवसांतही विविध वैचारिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महाविद्यालय परिसरात भक्तिमय वातावरणासोबतच ज्ञान, विचार आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती येत आहे.या वैचारिक व्याख्यानमालेसाठी सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी होत असून आनंद घेत आहेत.


 
Top