धाराशिव (प्रतिनिधी)-  पावसाच्या दीर्घ खंडामुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. पीक नुकसानीबाबत शासन सकारात्मक असून येत्या काही दिवसांत मदतीसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईलफ अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. यावेळी सरनाईक यांनी शेतातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.

पालकमंत्री सरनाईक यांनी 17 सप्टेंबर रोजी धाराशिव तालुक्यातील खेड येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन पावसाच्या दीर्घ खंडामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार मृणाल जाधव तसेच संबंधित विभागांचे गावपातळीवरील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री सरनाईक यांनी खेड येथील शेतकरी ज्ञानेश्वर टकले, शेतकरी वासुदेव मेटे यांच्या शेताला भेट देऊन नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यांनी टकले यांच्याशी थेट संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली.जवळपास शंभर टक्के सोयाबीन पीक हातचे गेल्याची व्यथा श्री.टकले यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली.एवढ्या मोठ्या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनाने पीक नुकसानीपोटी भरीव आर्थिक मदत करावी,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री सरनाईक यांनी व्हिडीओ कॉलद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दुष्काळाचे भीषण वास्तव मांडले. त्यांनी नंतर शिंदे यांनी जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार यांच्याशी चर्चा करून त्वरीत पंचनामा अहवाल पाठवावा असे सांगितले. 

 
Top