तुळजापूर (प्रतिनिधी)-श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर आणि विचार विकास मंडळाचे महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ फिल्ड प्रोजेक्ट रायटींग, प्रॅक्टीकल गाईड टू रिसर्च मेथडॉलॉजी या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
कार्यशाळेच्या माध्यमातून बी.कॉम. व एम.कॉम.च्या विद्यार्थ्यांना फिल्ड प्रोजेक्ट तयार करण्याची शास्त्रीय पद्धत, संशोधनाची प्रक्रिया, प्राथमिक माहितीचे संकलन, क्षेत्रीय सर्वेक्षण, मुलाखत, प्रत्यक्ष निरीक्षण, माहितीचे विश्लेषण आणि संशोधन अहवाल लेखन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत एस.बी .ई.एस आर्ट्स , कॉमर्स व सायन्स कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे प्राध्यापक डॉ. दिलीप एस. चव्हाण आणि महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील वाणिज्य विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नरेश पिनमकर यांनी संसाधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी क्षेत्रीय अभ्यास करताना समस्या निश्चित करणे, योग्य संशोधन प्रश्न तयार करणे, विश्वसनीय प्राथमिक माहिती मिळविणे तसेच उपलब्ध माहितीचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करून निष्कर्ष मांडणे या बाबींवर विशेष मार्गदर्शन मिळाले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. दिलीप चव्हाण यांनी फिल्ड प्रोजेक्ट हा केवळ शैक्षणिक औपचारिकता नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील समस्या समजून घेण्याची आणि त्यावर संशोधनात्मक दृष्टिकोनातून विचार करण्याची संधी असल्याचे स्पष्ट केले. तर डॉ. नरेश पिनमकर यांनी संशोधन पद्धतीचा योग्य वापर करून प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण प्रकल्प अहवाल कसा तयार करावा, याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे आयोजन तुळजाभवानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. जीवन पवार तसेच महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूरचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संयोजक म्हणून डॉ. नेताजी बी. काळे आणि डॉ. व्ही. पी. शेळके यांनी कार्य केले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. दत्तात्रय साळुंखे, प्रा. निलेश एकदंते, प्रा. सुदर्शन गुरव, यांच्यासह आयोजन समितीतील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेला विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना संशोधनाची मूलभूत तत्त्वे आणि फिल्ड प्रोजेक्ट लेखनाची प्रत्यक्ष दिशा मिळाल्याने कार्यशाळा अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरली.
‘ज्ञानाचा प्रसार, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संशोधनात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास’ या उद्देशाला अधोरेखित करणारी ही कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. सदरील कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ.बापूराव पवार प्रा. डॉ.मंत्री आडे प्रा. बालाजी कऱ्हाडे ,प्रा.सुदर्शन गुरव तसेच सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले.
