धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिजाऊ चौक या महत्त्वाच्या मार्गावरील काँक्रीट रस्त्याच्या कामावरून आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाच छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात काँक्रीटला तडे गेल्याचे दिसून आले. रस्त्याचे फिनिशिंगचे काम अद्याप बाकी असतानाच तडे पडल्याचे फोटो आणि व्हिडीओ काही स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला.

या व्हिडीओची दखल घेत शिवसेनेचे नगरसेवक प्रदीप मुंडे, सोमनाथ गुरव, अमित उंबरे,नाना घाटगे, सह्याद्री राजेनिंबाळकर, हर्षद ठवरे यांनी घटनास्थळी जाऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काँक्रीट रस्त्याला तडे गेल्यानंतर संबंधितांकडून त्या भागावर सिमेंटचे पाणी टाकून वरवरची बाजाबूज करण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने करण्याऐवजी तात्पुरती मलमपट्टी करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच त्याला तडे जात असतील, तर कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या या कामात नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होता कामा नये. त्यामुळे संबंधित विभागाने या कामाची तातडीने तांत्रिक तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण झाले नाही किंवा कामात अनियमितता आढळली, तर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी प्रयत्न करू, असा इशाराही नगरसेवकांनी दिला.

दरम्यान, नागरिक आणि व्यापाऱ्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केलेल्या फोटो-व्हिडीओमुळे रस्त्याच्या कामाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे केवळ वरवरची दुरुस्ती न करता रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य आणि कामाच्या पद्धतीची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे. 

 
Top