धाराशिव (प्रतिनिधी)- पावसाच्या दीर्घ खंडामुळे शिवारातील पिकांबरोबरच आता पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न ऐरणीवर येत आहे. येणाऱ्या काळात जनावरांच्या चाऱ्याची कमतरता भासू नये,यासाठी जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक चारा स्रोताचा काटेकोर आणि परिणामकारक वापर करण्याची गरज आहे.आगामी गळीत हंगामात ऊस तोडणीनंतर उपलब्ध होणारा ऊस वाडा वाया जाऊ न देता त्याचे नियोजनबद्ध संकलन करून जनावरांच्या चाऱ्यासाठी जास्तीत जास्त वापर करावा. तसेच मुरघास निर्मितीला चालना देऊन तो स्थानिक पशुपालकांना उपलब्ध होईल, यासाठी आतापासूनच नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी,कृषी विभाग,पशुसंवर्धन विभाग तसेच मुरघास निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीत आगामी काळातील संभाव्य चारा गरज, ऊस तोडल्यानंतर उपलब्ध होणार ऊस वाडा उपलब्ध चारा स्रोत होवू शकतो. ऊस वाड्याचे संकलन व वापर आणि मुरघास निर्मिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
