धाराशिव (प्रतिनिधी)- पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे शिवारातील पिकांबरोबरच आता पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.येणाऱ्या काळात जनावरांच्या गोठ्यात चारा कमी पडू नये आणि उपलब्ध चाऱ्यासाठी पशुपालकांची धावपळ होऊ नये,यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.जिल्ह्यात उत्पादित झालेला किंवा उपलब्ध असलेला चारा व्यावसायिक अथवा अन्य कारणांसाठी जिल्ह्याबाहेर वाहून नेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.तसेच जिल्ह्यातून चारा बाहेर पाठविण्यावर सक्त प्रतिबंध करण्यात आला असून,उपलब्ध चारा प्राधान्याने जिल्ह्यातील शेतकरी आणि गोशाळांमधील पशुधनासाठी राखून ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांचा चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.अशा परिस्थितीत जिल्ह्यातील पशुधन व इतर जनावरांचे संगोपन करणे आणि त्यांना जनावरांच्या खाद्याचा पुरवठा सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या काही भागांतून जिल्ह्याबाहेर चारा इतर व्यावसायिक कारणांसाठी किंवा इतर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.ही वाहतूक सुरू राहिल्यास येथील स्थानिक पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊन जनावरांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,2005 मधील तरतुदींनुसार जिल्ह्याच्या हद्दीत चारा वाहतुकीवर तात्काळ नियंत्रण आणणे आणि आवश्यक आदेश देणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी जिल्ह्याच्या हद्दीत चाऱ्याबाबत निर्बंध व आदेश लागू केले आहेत.
सीमांवर आणि चेकपोस्टवरही लक्ष
चाऱ्याची जिल्ह्याबाहेर अनधिकृत वाहतूक होऊ नये,यासाठी अंमलबजावणी यंत्रणांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,धाराशिव यांना आदेशाची प्रत देण्यात आली आहे. तसेच पोलीस अधीक्षक,धाराशिव यांना जिल्ह्याच्या सीमांवर व चेकपोस्टवर चारा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांना निर्देश देण्याचे कळविण्यात आले आहे.