धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना केवळ सेवा देणे एवढ्यापुरती प्रशासनाची भूमिका मर्यादित न राहता,ती सेवा आणखी सहज,कमी प्रक्रियेत आणि कमीत कमी वेळेत प्रभावीपणे कशी देता येईल, यासाठी प्रत्यक्ष नागरिकांकडून सूचनाही मागविण्यात याव्यात. नागरिकांच्या अनुभवातून समोर येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक विभागाने करावा,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज ‌‘सुधारणा उत्सवाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत श्री.पुजार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सागर खुटकाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान आणि जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागरिकांना एखादी शासकीय सेवा घेताना नेमक्या कोणत्या अडचणी येतात,कोणत्या प्रक्रियेसाठी अधिक वेळ लागतो,कोणत्या टप्प्यावर अनावश्यक विलंब होतो आणि कोणती प्रक्रिया अधिक सोपी करता येऊ शकते,याचा प्रत्येक विभागाने विचार करावा. नागरिकांकडून मिळालेल्या सूचनांकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता प्रशासनाच्या कार्यपद्धतीत सुधारणा घडविण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे,असे श्री.पुजार यांनी सांगितले.

‌‘सुधारणा उत्सव' हा केवळ एका कालावधीपुरता उपक्रम न राहता कार्यालयीन कामकाज अधिक लोकाभिमुख करण्याची प्रक्रिया ठरली पाहिजे.विभागांनी आपल्या स्तरावर नागरिकांना सेवा देताना येणाऱ्या प्रक्रियात्मक अडचणी ओळखून त्या कमी करण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना पुढे आणाव्यात.ज्या प्रक्रिया सुलभ करता येतील,त्यासाठी ठोस उपाय सुचवावेत. नागरिकांचा वेळ,श्रम आणि कार्यालयात होणाऱ्या फेऱ्या कमी होतील,या दृष्टीने सुधारणांचा विचार करावा,असे मार्गदर्शनही त्यांनी केले.

शासकीय कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकाला संबंधित अधिकारी कधी भेटणार,याबाबत अनिश्चितता राहता कामा नये. कार्यालयातील अधिकाऱ्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ निश्चित असली पाहिजे आणि नागरिकांची संबंधित अधिकाऱ्यांसोबत भेट झाली पाहिजे,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांची कामे करावीत.नागरिकाला साध्या कामासाठी वारंवार कार्यालयात यावे लागू नये.शक्य असलेल्या सेवा एकाच दिवसात देण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक कार्यालयाकडून नागरिकांना नेमक्या कोणकोणत्या सेवा दिल्या जातात,त्या मिळविण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे आणि त्यासाठी कुणाशी संपर्क साधायचा आहे,याची माहिती नागरिकांना सहजपणे उपलब्ध झाली पाहिजे.त्यामुळे कार्यालयाच्या दर्शनी भागात नागरिकांसाठी आवश्यक सूचना तसेच संबंधित विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती ठळकपणे लावण्यात यावी,असे निर्देश श्री.पुजार यांनी दिले.

आपल्या कार्यालयाकडून कोणत्या सेवा मिळतात,हे नागरिकांना माहीत असले पाहिजे असे सांगून श्री.पुजार म्हणाले की,शक्य असलेल्या सेवा एकाच दिवसात देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. नागरिकाला सेवा मिळविण्याची प्रक्रिया जितकी सोपी होईल,तितका प्रशासनावरील त्याचा विश्वास अधिक दृढ होईल,असे त्यांनी सांगितले.

‌‘सुधारणा उत्सवामध्ये जिल्ह्यातील कोणकोणते विभाग आपल्या स्वतंत्र संकल्पनांवर काम करणार आहेत,त्याची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.प्रत्येक विभागाने आपल्या दैनंदिन कामकाजाकडे नव्या दृष्टीने पाहून नागरिकांना सेवा देताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करावा.कमी कागदपत्रे,कमी प्रक्रिया,कमी प्रतीक्षा आणि अधिक परिणामकारक सेवा,या दिशेने कोणते बदल करता येतील,याचा विचार करून सुधारणा सुचवाव्यात,असे श्री.पुजार यांनी सांगितले.

एखादी सेवा देताना वारंवार मागितली जाणारी माहिती,अनावश्यक कार्यालयीन टप्पे,सेवा मिळण्यासाठी लागणारा कालावधी आणि नागरिकांना कराव्या लागणाऱ्या फेऱ्या यांचा संबंधित विभागांनी आढावा घ्यावा.नागरिकांकडून आलेल्या व्यवहार्य सूचनांचा अभ्यास करून शक्य त्या सुधारणा कार्यालयीन कार्यपद्धतीत आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत,असे मार्गदर्शनही बैठकीत करण्यात आले.

शासकीय सेवा ही नागरिकांच्या सोयीसाठी आहे.त्यामुळे कार्यालयीन कार्यपद्धतीच्या केंद्रस्थानी नागरिक असणे आवश्यक आहे.नागरिकाला कार्यालयात आल्यानंतर योग्य माहिती,योग्य मार्गदर्शन आणि संबंधित सेवा वेळेत मिळाली तर त्याचा प्रशासनाशी असलेला संवाद अधिक सकारात्मक होतो.‌‘सुधारणा उत्सवाच्या माध्यमातून अशा छोट्या-छोट्या,पण नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या बदलांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या बैठकीला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शिवाजी फुलारी, वैद्यकीय अधिकारी डॉ.निखिल चव्हाण, सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे निरीक्षक नितीन गोटे,कौशल्य विकास कार्यालयाचे एन.एस.बनसोडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक ए.जी.साळुंखे,पणन विभागाचे डी.एम.कांबळे,जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे डी.ए.जाधव,एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे एस.एस.शिंदे,महिला व बालविकास विभागाचे जिल्हा संरक्षण अधिकारी बी.टी.भोसले,क्रीडा मार्गदर्शक शुभांगी रोकडे,अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती पी.डी.इंबडे उपस्थित होते.विविध विभागांचे अधिकारी ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभागी होते. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी केले.


 
Top