धाराशिव (प्रतिनिधी)- समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनविण्याचा ध्यास घेतलेल्या क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याला त्यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त धाराशिव येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी त्यांच्या सामाजिक व आर्थिक चळवळीतील योगदानाचे स्मरण करण्यात आले.तसेच महामंडळाच्या राबविण्यात येणाऱ्या विविध योजना,त्यांची अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांना मिळणारे अर्थसहाय्य याबाबतही माहिती देण्यात आली. समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांनी केवळ परिस्थितीवर अवलंबून न राहता उद्योग- व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे,यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे.समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेकांना स्वावलंबनाची दिशा मिळाली. त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक चळवळीतील योगदानाला यावेळी उजाळा देण्यात आला.
स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेत महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.महामंडळाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देत उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा कार्यालयातील सर्व जिल्हा समन्वयक,अधिकारी- कर्मचारी तसेच महामंडळाचे लाभार्थी उपस्थित होते. स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याचे स्मरण,त्यांच्या स्वावलंबनाच्या विचारांचा जागर आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
