तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरासह परिसरात अनंत चतुर्थी दिनी शुकवार दि 24 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जय घोषात विघ्नहर्ता गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. विघ्नहर्ता गणरायाला निरोप दिल्यानंतर आता तुळजापूरकरांना श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पूर्व तयारीचे वेध लागले असून पूर्वतयारीस आरंभ झाला आहे “
श्री तुळजाभवानी मंदिरातील विघ्नहर्ता गणरायाच्या मूर्तीची छबिना वाहनावर प्रतिष्ठापना करून मंदिर प्रदक्षिणा मार्गावरून भावपूर्ण मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. किरण पुजार, प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने, महंत, मंदिर अधिकारी-कर्मचारी तसेच भाविकांच्या प्रमुख उपस्थितीत गणरायाची अखेरची आरती करण्यात आली. त्यानंतर धार्मिक विधी पार पाडून विघ्नहर्ता गणरायाचे श्रीकल्लोळतीर्थ कुंडात विसर्जन करण्यात आले. शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी यापूर्वीच विसर्जन मिरवणुका काढल्याने अनंत चतुर्दशीला मोजक्या मंडळांनीच मिरवणुका काढत गणरायाला निरोप दिला. काही ठिकाणी डीजेचा दणदणाट आणि ढोल-ताशांचा कडकडाट पाहायला मिळाला, तर काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या साथीने साधेपणाने मिरवणूक काढत धार्मिक परंपरेला प्राधान्य दिले.
यंदाच्या मिरवणुकांमध्ये मराठी गीतांचाही बोलबाला दिसून आला. ‘फियाट गाडी माझी म्हणू का?', ‘पाखरा पाखरा आझाद केले तुला' यांसह एकापेक्षा एक लोकप्रिय मराठी गीतांवर तरुणाईने ठेका धरला. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांना धार्मिक वातावरणासोबतच उत्साहाची आणि मराठमोळ्या जल्लोषाची किनार लाभली. नगरपरिषद व रोटरी क्लबच्या वतीने यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिक व गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला.

