मुरूम, (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार श्री माधवराव पाटील महाविद्यालयात मंगळवार (२२ सप्टेंबर) पासून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणी व पात्र नागरिकांच्या नावांचा समावेश करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेस परिसरातील तरुण आणि नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, नागरिकांनी महाविद्यालयात येऊन आपली नावनोंदणी करून घ्यावी, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी केले आहे.
या विशेष मोहिमेत विविध शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे, प्रा. डॉ. सतीश शेळके, प्रा. डॉ. विनायक रासुरे, प्रा. अक्षय हलसे, प्रा. लक्ष्मण पवार, डॉ. महेश मोटे, प्रा. डॉ. विलास खडके आदींनी पुढाकार घेतला आहे. तसेच, नमुना ६ द्वारे करावयाच्या नवीन मतदार नोंदणीच्या संदर्भातील सविस्तर माहिती व मार्गदर्शन प्रा. डॉ. विलास खडके व प्रा. डॉ. महेश मोटे यांच्यामार्फत दिले जात आहे. जे भारतीय नागरिक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करत आहेत, ते सर्व तरुण व नागरिक नवीन मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र आहेत. अर्जदार भारताचा नागरिक असावा, कायदेशीररीत्या अयोग्य किंवा वेडा घोषित केलेला नसावा आणि त्याचे नाव यापूर्वी इतर ठिकाणच्या मतदार यादीत समाविष्ट नसावे.
नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ भरणे बंधनकारक आहे. नागरिक भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घरबसल्या ऑनलाइन अर्ज भरू शकतात अथवा महाविद्यालयाशी संपर्क साधून नमुना ६ चा अर्ज मिळवून कागदपत्रेंसह जमा करू शकतात. जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा
दाखला / दहावीचे प्रमाणपत्र
पॅन कार्ड किंवा पासपोर्ट, आधार कार्ड किंवा बँक/पोस्ट ऑफिसचे पासबुक, सध्याची पाणीपट्टी, वीज बिल किंवा महसूल विभागाचे कागदपत्र
पासपोर्ट साईझ रंगीत फोटो
आगामी अंतिम मतदार यादीमध्ये आपल्या नावाचा कायदेशीर समावेश व्हावा, यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या किंवा नोंदणीपासून सुटलेल्या सर्व पात्र नागरिकांनी लवकरात लवकर नमुना ६ चा अर्ज भरून मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
