धाराशिव (प्रतिनिधी)- शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील व शहरातील फळे पिकविणाऱ्या भट्ट्यांची तसेच बेकरी, हॉटेल्स,स्वीट मार्ट मधील खाण्याच्या पदार्थांची तपासणी होऊन कारवाई होणे बाबत आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन पाठविण्यात आले. सदरचे निवेदन सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन धाराशिव जिल्हा यांच्यामार्फत पाठविण्यात आले. 

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की, धाराशिव जिल्ह्यात तसेच धाराशिव शहरात नागरिकांना सेवन करण्याच्या फळांच्या भट्ट्या या अनधिकृत, नियमांची पायमल्ली करून, आरोग्यास हानिकारक अशा प्रकारे सुरू आहेत. मानवी जीवनाला अपाय होईल व शासनाने बंदी घातलेल्या हानिकारक केमिकल्सचा व पदार्थांचा वापर करून फळे पिकविणाऱ्या भट्ट्या उघडपणे राजरोसपणे सुरू आहेत. तसेच धाराशिव शहरात व जिल्ह्यात अनेक  मांसाहारी व शाकाहारी हॉटेल्स, बेकरी, स्वीट मार्ट, या ठिकाणी नियमाला न धरून व नैसर्गिक रित्या पदार्थांची निर्मिती न करता बंदी असलेल्या पदार्थांचा, केमिकल्सचा, रंगांचा वापर करून गोड व तिखट खाण्याच्या पदार्थांची निर्मिती केली जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्य व्यवस्थेवर अत्यंत घातक परिणाम होऊन कॅन्सर सारखे दुर्धर आजार प्रचंड प्रमाणात वाढून मानवी जीवनाला धोका निर्माण झालेला आहे. तरी आपल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या फळांच्या भट्ट्या, हॉटेल्स, बेकरी, स्वीट मार्ट यांची तातडीने सखोल चौकशी, पडताळणी व तपासणी होऊन दोषी, आरोग्यास हानिकारक, शासनाच्या नियमाला डावलून, नागरिकांच्या आरोग्याचा जीवघेणा व्यापार उद्योग करणाऱ्या उद्योग समूहावर व संबंधित जबाबदार लोकांवर तातडीने कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा समितीच्या वतीने या विरोधात मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे उपाध्यक्ष हनुमंत यादव, सचिव आकाश भोसले, शहराध्यक्ष संतोष घोरपडे, हनुमंत तांबे, रामानंद माढेकर, दत्तात्रय साळुंके, अविनाश रणखांब, अमोल साळुंके, विशाल घोडके इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top