तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर-लातूर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ कारने दोन पादचाऱ्यांना चिरडून विद्युत खांबाला धडक दिल्याने कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक पादचारी ठार झाला, तर अन्य पाच जण जखमी झाले. ही घटना रविवार, 20 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कार क्रमांक एमएच 25 बीए 1600 ही लातूर रोडवरून तुळजापूरकडे येत होती. पेट्रोल पंपाजवळील सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या तुळजापूर येथील दोन पादचाऱ्यांना कारने धडक दिली. त्यानंतर कार महामार्गावरील विद्युत खांबाला धडकून पलटी झाली.

या अपघातात तुळजापूर येथील पापनास नगर परिसरात राहणारे शम्मु बासुमियाँ नदाफ यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी लालबी शम्मु नदाफ गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथे रवाना करण्यात आले आहे. या अपघातात कारमधील विजया श्रीराम तळघडे, विहान मोहन गाडगे (सोलापूर), दशरथ केशव गिरी आणि विनायक सचिन खके (लातूर) हे चौघे जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. कारचालक सर्व्हिस रोडवरून भरधाव वेगाने जात असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत.

 
Top