तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या भक्तीची अनोखी अनुभूती देणारा भव्य धार्मिक देखावा तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या मूळ गावी श्री क्षेत्र अरण (ता. माढा, जि. सोलापूर) येथे महालक्ष्मी उत्सवानिमित्त साकारण्यात आला आहे. आई तुळजाभवानीच्या साक्षात स्वरूपाची अनुभूती देणारा हा देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांसह नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
महालक्ष्मीसमोर साकारण्यात आलेल्या या देखाव्यात सिंहासनावर विराजमान झालेली आई तुळजाभवानी मातेची आकर्षक मूर्ती मुख्य आकर्षण ठरली आहे.
तुळजापूरच्या धार्मिक वैभवाची आठवण करून देणाऱ्या या देखाव्यात राजे शहाजी महाद्वाराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील धार्मिक परंपरा आणि वास्तूवैभवाची झलक या माध्यमातून भाविकांना अनुभवता येत आहे. तसेच देखाव्यामध्ये मोरया, गोंधळ आणि विविध धार्मिक विधींचे सादरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे हा केवळ सजावटीचा देखावा न राहता आई तुळजाभवानीच्या भक्ती, परंपरा आणि धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा उपक्रम ठरला आहे. महालक्ष्मी उत्सवानिमित्त साकारण्यात आलेला हा देखावा पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला असून, आई तुळजाभवानीच्या भक्तीने अरण नगरी भक्तिमय झाली आहे.
