तुळजापूर (प्रतिनिधी)- लहानपणीच आईचे छत्र हरपले. वडील टेलरिंगचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवत जिद्दीने अभ्यास केला. परिस्थितीसमोर हार न मानता चिंचोली येथील प्रमोद भीमराव घोडके यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. त्यांच्या या यशातून महसूल सहाय्यकपदी निवड झाली असून, ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
प्रमोद घोडके यांनी आपले प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा, चिंचोली येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत पूर्ण केले. त्यानंतर जयप्रकाश विद्यालय, रुईभर येथे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव येथे अकरावी-बारावी तसेच बीएएस्सी (पीसीएम) पदवीचे शिक्षण पूर्ण केले. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही शिक्षणाची कास न सोडता प्रमोद यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मेहनत, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी परीक्षेत यश संपादन केले. त्यांच्या या यशाने चिंचोली गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
या यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने अंकुश नन्नवरे यांच्या हस्ते प्रमोद घोडके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील शासकीय सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सत्काराला उत्तर देताना प्रमोद घोडके म्हणाले, “माझ्या या यशात ग्रामस्थांचे मोठे योगदान आहे. त्यांचे हे सहकार्य मी कधीही विसरणार नाही. शासकीय सेवेत गेल्यानंतर माझ्याकडून गावाची जेवढी सेवा करता येईल, तेवढी सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
यावेळी प्रशांत पवार, राहुल चौधरी, सुधीर घोडके, रामचंद्र ढवळे, सचिन पाटील, कालिदास मातोले, संजीव कदम, किरण पाटील, बालाजी बोराटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
