तुळजापूर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र महोत्सव तोंडावर आला असताना तुळजापूर शहरातील राजे शहाजी महाद्वार ते मलबा हॉस्पिटलदरम्यानच्या रस्त्याची झालेली दुरवस्था भाविक आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून नवरात्र काळात वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवरात्र महोत्सव सुरू होण्यापूर्वी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून संपूर्ण डांबरीकरण करावे, अशी मागणी नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे.

शारदीय नवरात्र महोत्सवासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक तुळजापूरमध्ये दाखल होत असतात. राजे शहाजी महाद्वार ते मलबा हॉस्पिटल हा मार्ग भाविक, नागरिक आणि वाहनांच्या मोठ्या वर्दळीचा असल्याने रस्त्याची सध्याची अवस्था चिंताजनक आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह पायी जाणाऱ्या भाविकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन सदर रस्त्याची तातडीने पाहणी करावी, खड्डे बुजवावेत, रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ही कामे यात्रा कर अनुदानातून तातडीने करण्यात यावीत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

नवरात्र महोत्सव सुरू होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती पूर्ण करून भाविक व नागरिकांची सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. नवरात्राच्या काळात लाखो भाविक तुळजापूरमध्ये येत असताना प्रशासनाने रस्त्यांच्या दुरुस्तीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

 
Top