तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2चा माजी विद्यार्थी सिद्धार्थ शहाजीराव शिंगाडे याला भारत सरकारच्या ललित कला अकादमीचा राष्ट्रीय ललित कला पुरस्कार जाहीर झाला आहे. सिद्धार्थच्या या यशामुळे तुळजापूरच्या शैक्षणिक व कलाक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिद्धार्थ शिंगाडे याला ‘वृक्ष' या शीर्षकाच्या कलाकृतीसाठी हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच्या कलाकृतीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत त्याची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राजधानी दिल्ली येथील रवींद्र भवन येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, सांस्कृतिक विभागाचे सचिव विवेक अग्रवाल आणि सहसचिव के. के. मिश्रा यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे. सामान्य परिस्थितीतून पुढे येत आपल्या कलेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविणाऱ्या सिद्धार्थ शिंगाडे याच्या या यशाचे तुळजापूर शहरातून कौतुक होत आहे. त्याच्या निवडीबद्दल शिक्षण, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांसह नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
