तुळजापूर (प्रतिनिधी)- विघ्नहर्ता गणरायाला निरोप देताना यंदा शहरी आणि ग्रामीण भागातील दोन टोकाचे चित्र ठळकपणे समोर आले. शहरांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने उत्साहाचा सुकाळ, विद्युत रोषणाईने फुलुन गेलेले रस्ते डीजेचा दणदणाट, रोषणाई आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले; तर दुसरीकडे ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळांनी उत्साहावरच पाणी फेरले. शेतकऱ्यांच्या घरात सण होता; मात्र सणासुदीच्या आनंदापेक्षा उद्याच्या जगण्याची चिंता अधिक होती.
यंदा पावसाने सुरुवातीपासूनच मोठी ओढ दिल्याने खरीप हंगाम हातातून निसटला आहे. पावसाळ्याच्या दिवसांतही विहिरी, नदी-नाले, ओढे कोरडेठाक पडले आहेत. शेतात उभे असलेले पीक पाण्याअभावी करपले, तर पुढील रब्बी हंगामाचेही भविष्य अनिश्चित झाले आहे. शेतातून उत्पन्नाची एकही आवक होण्याची शक्यता नसताना बळीराजा कर्ज, कुटुंबाचा खर्च आणि पुढील पिकाच्या चिंतेत अडकला आहे.
एकीकडे शहरांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात रस्ते रोषणाईने उजळून निघाले. डीजेच्या दणदणाटात मिरवणुका, गुलालाची उधळण आणि उत्साहाच्या लाटेत गणरायाचा उत्सव साजरा झाला. दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र बैलपोळ्यापासून गणेश विसर्जनापर्यंतचे सण बळीराजाने भाजी-भाकरीवर साजरे केले. सणासुदीच्या दिवसांतही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदापेक्षा चिंतेच्या रेषा अधिक दिसत होत्या. कारण हातात पैसा नाही, शेतात पीक नाही आणि पाण्याची शाश्वती नाही. त्यामुळे गणेशोत्सवाचा उत्साहही अनेक शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचू शकला नाही. शहरात सात-आठ दिवसांनी पाणी येत आहे. तरी उत्सवाचा जल्लोष मात्र कायम आहे. ‘जगाचा अन्नदाता असलेला शेतकरी आज मात्र स्वतः अन्नाच्या चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.