परंडा (प्रतिनिधी)- श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परंडा येथील विविध विभागांतील सहा प्राध्यापकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम अंतर्गत पदोन्नती मिळाल्याबद्दल महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा विशेष सत्कार केला.

महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातील डॉ. शहाजी चंदनशिवे व डॉ.अतुल हुंबे तसेच वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ.प्रकाश सरवदे यांची प्राध्यापकपदी पदोन्नती झाली आहे.तर इंग्रजी विभागाचे डॉ.प्रशांत गायकवाड डॉ.सचिन चव्हाण डॉ. संभाजी गाते यांची सहयोगी प्राध्यापकपदी पदोन्नती झाली आहे.ही पदोन्नती विद्यापीठाच्या अकॅडमिक स्टाफ कॉलेज, विद्यापीठ परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या प्रक्रियेनंतर  अंतर्गत देण्यात आली. दीर्घकाळाची अध्यापनसेवा, शैक्षणिक योगदान, संशोधनकार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आणि महाविद्यालयीन स्तरावरील विविध जबाबदाऱ्यांचा विचार करून ही पदोन्नती देण्यात आली आहे.आपल्या गुरूंना मिळालेल्या या शैक्षणिक सन्मानाचा आनंद व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी समर्थ कुळधर्मे, प्रीतम डाके, सूरज बनसोडे, अनिकेत रोहिटे, शिवम भातलवंडे आणि प्रशांत कोळेकर यांनी महाविद्यालयात येऊन सर्व पदोन्नत प्राध्यापकांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, महाविद्यालयातील शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रमाचे ज्ञान दिले नाही, तर जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याची दृष्टी, शिस्त, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण केली. आज आपल्या गुरूंना प्राध्यापकपदाचा सन्मान मिळणे ही माजी विद्यार्थ्यांसाठीही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. पदोन्नती मिळालेल्या प्राध्यापकांनी माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या या प्रेमळ सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते हे केवळ महाविद्यालयीन जीवनापुरते मर्यादित नसून ते आयुष्यभर टिकणारे असते.माजी विद्यार्थ्यांनी गुरूंच्या कार्याची दखल घेऊन केलेला हा सत्कार शिक्षकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीत सहा प्राध्यापकांना मिळालेली ही पदोन्नती महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घालणारी असून, त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

“गुरूंच्या ज्ञानातून घडलेले विद्यार्थी जेव्हा गुरूंच्या यशाचा गौरव करतात, तेव्हा शिक्षक-विद्यार्थी नात्याची खरी श्रीमंती अधोरेखित होते,”अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 
Top