धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजना,विकासाचे उपक्रम आणि त्यातून होत असलेले परिवर्तन सामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी समजून घेता यावे,यासाठी मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन हे महत्त्वाचे माध्यम आहे.त्यामुळे अशा माहितीपूर्ण प्रदर्शनांचे आयोजन नागरिक आणि शासन यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने धाराशिव येथील मध्यवर्ती बस स्थानकात आयोजित दोन दिवसीय मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रदर्शनाला आज मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी सुरुवात झाली.

उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर,पत्र सूचना अधिकारी हर्षल आकुडे,केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रसिद्धी प्रमुख सुमित दोडल,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अजय पाटील,आगार प्रमुख प्रविण भोंडवे,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके आदी मान्यवर उपस्थित होते.


‌‘विश्वास, विकास आणि जनकल्याणा'ची वाटचाल प्रदर्शनातून

केंद्र सरकारच्या सेवेची 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने केंद्रीय संचार ब्यूरो,माहिती व प्रसारण मंत्रालय,भारत सरकारच्या क्षेत्रीय कार्यालय सोलापूर आणि जिल्हा प्रशासन,धाराशिव यांच्या सहकार्याने मध्यवर्ती बस स्थानकात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.


‌‘12 वर्षे विश्वासाची,विकासाची, जनकल्याणाची  विकसित भारत

जी राम जी विधेयक-2025, राष्ट्रीय पोषण अभियान' या संकल्पनेवर हे मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन आधारित आहे. प्रदर्शनामध्ये ग्रामीण रोजगाराशी संबंधित ‌‘विकसित भारत गॅरंटी रोजगार मिशन-2025 (व्ही.बी.जीराम जी कायदा-2025)' या विषयाची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे.


राष्ट्रीय पोषण माहनिमित्त विशेष दालन

सप्टेंबर महिना ‌‘राष्ट्रीय पोषण माह' म्हणून साजरा करण्यात येतो.त्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनात पोषण आहाराबाबत स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे.यामध्ये पोषण आहाराच्या पाककृती आणि भरडधान्यांचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यासाठी विशेष माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्यपूर्ण जीवनासाठी योग्य आणि संतुलित आहाराचे महत्त्व,दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश आणि भरडधान्यांचे आहारातील स्थान याबाबत या दालनातून जनजागृती करण्यात येत आहे.


एका छताखाली विविध योजनांची माहिती

प्रदर्शनामध्ये केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना आणि उपक्रमांसह त्यांच्या उद्दिष्टपूर्तीची माहिती छायाचित्रे आणि एलईडी वॉलच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडण्यात आली आहे. यामध्ये पीएम विश्वकर्मा योजना,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री जनधन योजना आणि यूपीआय व्यवहार,प्रधानमंत्री कुसुम योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्टार्टअप योजना,प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, उजाला योजना तसेच सौरऊर्जेशी संबंधित योजना अशा विविध योजनांची माहिती नागरिकांना प्रदर्शनातून मिळत आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक क्षेत्र,कृषी, संरक्षण,आरोग्य,वाहननिर्मिती आणि विमान क्षेत्रात आत्मनिर्भर भारताने केलेली वाटचाल तसेच विविध क्षेत्रांतील विकास आणि ‌‘विकसित भारत'चे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.


‌‘हरित धाराशिव'चा संदेश ; देशी रोपांचे मोफत वितरण

प्रदर्शनाला पर्यावरण संवर्धनाचीही जोड देण्यात आली आहे.धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्स्फूर्त लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या ‌‘हरित धाराशिव' उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन आणि वन विभागाच्या वतीने प्रदर्शनस्थळी मोफत वृक्ष वितरण स्टॉल उभारण्यात आला आहे. या स्टॉलवर चिंच,पेरू,जांभूळ,खजूर आदी देशी प्रजातींच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात मोफत वितरण करण्यात आले.नागरिकांनीही या उपक्रमाला प्रतिसाद दिला.


दरम्यान,परिवर्तन सेवाभावी संस्था,लातूर यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.मनोरंजनासोबतच विविध विषयांवरील जनजागृतीचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.मध्यवर्ती बस स्थानकात आयोजित हे दोन दिवसीय मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांसाठी मोफत खुले राहणार आहे.


केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, विकसित आणि आत्मनिर्भर भारताची वाटचाल,पोषण अभियान तसेच विविध विकास उपक्रमांची माहिती एकाच ठिकाणी जाणून घेण्याची संधी या प्रदर्शनातून उपलब्ध झाली आहे. विद्यार्थी,युवक,महिला,शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन विविध शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 
Top