भूम (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जपत गरजू व पालावरील कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासह शहरातील व्यापारी वर्गाला आर्थिक पाठबळ देत व्यवसायवाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जनविश्वास समूहाच्या व्हॉईस चेअरमन संध्या संतोष वीर यांना ‘मराठवाडा कला गौरव 2026' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठवाडा लोककला विकास मंडळ व मराठवाडा वृद्ध साहित्यिक कलाकार संघटना, भूम यांच्या वतीने महिला उद्योगिका व समाजसेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भूम येथील यश मंगल कार्यालय, परंडा रोड येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी परिविक्षाधीन पोलीस अधिकारी अमोल मोहिते, मराठवाडा लोककला विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव इंदलकर, हभप अरुण शाळू महाराज यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनविश्वास समूहाच्या वतीने मागील पाच वर्षांपासून गरजू तसेच पालावरील कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आनंदात सहभागी होत त्यांना सणाचा आनंद देण्याचे काम या उपक्रमातून केले जात आहे.
तसेच जनविश्वास नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून शहरातील व्यापारी वर्गाला माफक व्याजदरात तातडीने कर्ज सुविधा उपलब्ध करून देत व्यवसायवाढीसाठी अर्थसहाय्य करण्यात आले. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून देत आर्थिक प्रगतीला चालना देण्याच्या या कार्याचीही पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली. या सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील योगदानाबद्दल संध्या संतोष वीर यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
