तेर (प्रतिनिधी)- पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे होत असलेले नुकसान लक्षात घेऊन तातडीने मदत करण्याची मागणी तेर येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,तेर गावच्या शिवारात पिकाची अवस्था अत्यंत बिकट आहे.मागील 15 ते 30 दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून सोयाबीन,तूर, उडीद, कापूस व इतर पिकावर मोठा परिणाम झाला आहे.विशेषत: सोयाबीन पिक वाळत असून शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी न मिळाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.त्यामुळे गावातील नुकसानग्रस्त पिकाचे तातडीने पंचनामे करावेत तसेच सध्याची पिक परिस्थिती लक्षात घेऊन पिक कापणी प्रयोग सप्टेंबर महिन्यातच घेण्यात यावेत.यामुळे प्रत्यक्ष झालेले नुकसान योग्य पद्धतीने नोंदवता येईल व पात्र शेतकऱ्यांना पिकविमा व शासनाची नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल.सदर बाबीची तातडीने दखल घेऊन महसूल, कृषी व संबंधित विभागांना पंचनामे,पिक कापणी प्रयोग व पिकविमा व नुकसान भरपाई बाबत आवश्यक आदेश द्यावेत.जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत शासनाची मदत मिळेल व कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचीत राहाणार नाही असे निवेदनात नमूद केले आहे.या निवेदनावर पद्माकर फंड, नवनाथ नाईकवाडी, भास्कर माळी, मंगेश फंड,व्यंकट माळी यांच्या सह्या आहेत.
