भूम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यात मागील सुमारे 40 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांसह बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे भूम तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी भूम तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत 15 सप्टेंबर रोजी भूमचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

तालुक्यात पावसाने दीर्घकाळ खंड दिल्यामुळे हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, तूर, उडीद, मका, मूग आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच बागायती क्षेत्रातील भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब, पेरू, केळी, ड्रायफ्रूट तसेच लिंबूवर्गीय फळबागांनाही पाण्याअभावी मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून, शासनाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून भूम तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर 50 हजार रुपये, तर बागायती पिकांसाठी प्रति हेक्टर 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी तालुक्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.

पावसाअभावी शेती व्यवसायासमोर निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तातडीने सर्व मागण्यांना मंजुरी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी मधुकर मोटे, हनुमंत पाटुळे, संजय पाटील, विक्रम दराडे, राजेंद्र गाढवे, भाऊसाहेब चोरमोले, बापू गिलबिले, प्रदीप डोके,रियाज पठाण, रत्नदीप चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

 
Top