तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावणारआहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंदिर संस्थानच्या वतीने आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किरण पुजार यांनी दिली.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने यापूर्वीही नैसर्गिक आपत्तीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात दिला आहे. भूकंपग्रस्तांसाठी देवीच्या चरणी अर्पण होणारी वस्त्रे मोठ्या प्रमाणात मदत म्हणून देण्यात आली होती. तसेच मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरही मंदिर संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली होती. श्री तुळजाभवानी भक्तांच्या संख्येत शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे
यंदा धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी व ग्रामीण भाग मोठ्या संकटात सापडला आहे. खरीप पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि आगामी रब्बी हंगामाबाबतची चिंता अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत लवकरच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्तांची बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीत दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये किती निधी द्यायचा, याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी किरण पुजार यांनी सांगितले.
