तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरात रविवार, दि. 20 रोजी दोन वेगवेगळ्या मुद्द्यांवर झालेल्या आंदोलनांनी राजकीय व सामाजिक वातावरण चांगलेच चर्चेत आले. रामदारा तलावातील पाण्याच्या मुद्द्यावर शिवसेना (उबाठा) नेते आमदार अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारो आंदोलन केले. त्याचवेळी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाळलेल्या सोयाबीनची होळी करून शासनाचा निषेध केला.
कृष्णा खोऱ्यातील पाणी घाटणे बॅरेजमार्फत तुळजापूर येथील रामदारा तलावात आणण्याच्या विषयावर आमदार अंबादास दानवे यांनी सरकारने कृष्णा खोऱ्यातील पाण्याऐवजी तालुक्यातील सिंदफळ तलावातील पाणी रामदारा तलावात आणल्याचे वक्तव्य केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी आ. दानवे यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारो आंदोलन केले.
यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची प्रतिमा स्वच्छ असल्याचे सांगत आ. दानवे यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी केली. तसेच वक्तव्य मागे न घेतल्यास जिल्ह्यात प्रवेश बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात नगराध्यक्ष विनोद गंगणे, उपनगराध्यक्ष रामचंद्र रो चकरी, पंचायत समिती सभापती विक्रम देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
