भूम (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुका हा ऐतिहासिक वारसा, ग्रामीण संस्कृती आणि कलावंतांच्या योगदानासाठी ओळखला जातो. याच भूमच्या मातीतून पुढे आलेल्या हिवर्डा गावचे सुपुत्र शिवाजी करडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ‘सजना' या मराठी चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट वेशभूषा विभागातील 62 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. या सन्मानामुळे भूम तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
भूम तालुक्यातील वालवडजवळील हिवर्डा हे गाव शिवाजी करडे यांच्या जन्मगावामुळे आणि त्यांच्या कलात्मक कामगिरीमुळे आता राज्याच्या चित्रपट क्षेत्रात चर्चेत आले आहे. ग्रामीण भागातील मराठी माणसाची कल्पकता, मेहनत आणि जिद्द यांचे उदाहरण म्हणून करडे यांचे यश पाहिले जात आहे. राज्य शासनाच्या वेशभूषा विभागातील हा त्यांचा दुसरा पुरस्कार आहे.
‘सजना'च्या वेशभूषेला राज्य शासनाची दाद
‘सजना' चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनच्या काळात वेशभूषा विभागाला अत्यल्प वेळ मिळाला होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात शिवाजी करडे आणि भाग्यश्री राऊत यांच्यावर कामाचा मोठा भार होता. त्यानंतर विभागात सदस्यांची भर पडत गेली. तयार केलेली डिझाईन्स प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रसाद परदेशी यांनीही मोठी मेहनत घेतली. आपल्या यशाबद्दल शिवाजी करडे म्हणाले, “हा अवॉर्ड ‘सजना'च्या पूर्ण वेशभूषा टीमच्या मेहनतीचे फळ आहे. विशेष करून भाग्यश्री राऊतचा सुंदर आणि भन्नाट बनण्यामागे खूप मोठा वाटा आहे. संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे हे यश मिळाले.
