भुम (प्रतिनिधी)- मराठवाड्याच्या गौरवशाली स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचे स्मरण आणि त्यातून स्वातंत्र्यसैनिकांच्या अभिमानाचा वारसा पुढे नेण्यासाठी ‌‘मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव 2026'चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 17 सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे उत्साहात होणार आहे. 

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाची नव्या पिढीला ओळख करून देणे, मराठवाडा आणि पुणे यांच्यातील भावनिक नाते अधिक दृढ करणे, परस्पर संवाद वाढविणे तसेच सामाजिक सलोखा व बंधुभाव वृद्धिंगत करणे, हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.


डॉ. ज्ञानेश्वर मुळे प्रमुख पाहुणे

महोत्सवासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव व राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, श्री. अशोक मोराळे राहणार आहेत. 


विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

महोत्सवात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‌‘मराठवाडा भूषण' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये प्रशासकीय क्षेत्रासाठी हुंमत खराडे, मराठवाडा मित्र पुरस्कारासाठी मयंक गांधी, साहित्य क्षेत्रासाठी प्रा. फ. म. शहाजींदे, शैक्षणिक क्षेत्रासाठी डॉ. मिलिंद आवाड, सामाजिक क्षेत्रासाठी डॉ. एकनाथ शेळके आणि उद्योग क्षेत्रासाठी शरद सावंत यांचा समावेश आहे. 


याशिवाय ‌‘वैभवशाली मराठवाडा' या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून, मराठवाड्याच्या इतिहास, संस्कृती आणि सामाजिक वाटचालीवर विचारमंथन होणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण जागविणाऱ्या या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 
Top