धाराशिव (प्रतिनिधी)- भक्तीला विचारांची, संस्कृतीला ज्ञानाची आणि उत्सवाला सामाजिक जाणिवेची जोड देत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.

 तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त बाळासाहेब वाघ,  अशोक भाऊ शिंदे, विजेंद्रअण्णा चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रम सिंह माने, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाच्या जल्लोषपूर्ण सादरीकरणात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्या तीन वर्षांपासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने वैचारिक व्याख्यानमालेची परंपरा सुरू आहे. यंदाही या परंपरेचे सातत्य राखत सलग नऊ दिवस विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील व्याख्याने आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता समाज, प्रशासन, आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास, करिअर आणि जीवनमूल्यांविषयीही सजग व्हावे, हा या व्याख्यानमालेमागील व्यापक उद्देश होता.

या व्याख्यानमालेत धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. तसेच शहरातील सह्याद्री हॉस्पिटलचे प्रमुख व संस्थापक डॉ. दीपक दापके, डॉ. वसुधा दापके, पोलीस निरीक्षक दराडे साहेब, अतिरिक्त पोलीस निरीक्षक सचिन पांडकर, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सागर खटावकर, प्राचार्या अनंतालक्ष्मी स्वामी, तसेच श्री कोचिंग क्लासेसचे दीपक भराटे, जवाहर माध्यमिक आश्रम शाळेचे जाधव एन बी, सागर सलगरकर,राठोड व्ही.टी, आनंद सुभाष जाधव यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

मान्यवरांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, करिअरच्या संधी, सामाजिक बांधिलकी, आरोग्यविषयक जागरूकता आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची सकारात्मक दृष्टी मिळाली. त्यामुळे गणेशोत्सवातील ही व्याख्यानमाला विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरली.

नऊ दिवसांच्या उत्सवात महाविद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. भक्ती, संस्कृती, कला आणि वैचारिक प्रबोधन यांचा सुंदर संगम या गणेशोत्सवातून अनुभवायला मिळाला.

गणेशोत्सवाच्या सांगतेच्या वेळी विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने वातावरणात विशेष रंग भरला. लेझीमचा ताल, ढोल-ताशांचा निनाद आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर जल्लोषमय झाला. गणेश विसर्जना दिवशी सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि स्टाफ यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. भक्तिभाव आणि आनंदाच्या वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. ‌‘उत्सवातून आनंद आणि व्याख्यानातून विचार' या संकल्पनेतून साकारलेला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा गणेशोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरला. भक्ती, ज्ञान, संस्कार, संस्कृती आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर मिलाफ घडवून आणणाऱ्या या नऊ दिवसांच्या गणेशोत्सवाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.  सलग नऊ दिवस चालणाऱ्या  या गणेशोत्सवासाठी  सर्व विभागातील स्टाफ आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

 
Top