धाराशिव (प्रतिनिधी)-  मराठवाड्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्यामुळे खरीप हंगामातील पिके अडचणीत आली आहेत. पावसाअभावी अनेक भागांमध्ये सोयाबीनसह तूर, मूग, उडीद, मका यासह इतर खरीप पिके वाळण्याच्या अवस्थेत आहेत. पिकांवर झालेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, उत्पादन खर्चही वसूल होणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी तुळजापूर आणि लोहारा तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून पावसाच्या खंडामुळे नुकसान होण्याच्या स्थितीत असलेल्या खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. 

शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सर्वप्रथम तुळजापूर व लोहारा तालुक्यातील गावांना भेट देऊन सोयाबीनसह इतर खरीप पिकांची पाहणी केली. पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून, पिकांची वाढ खुंटलेली तसेच अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या अवस्थेत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे निर्माण झालेली परिस्थिती, पिकांची सद्यस्थिती, शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च आणि संभाव्य आर्थिक नुकसान याबाबत खासदारांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली.  सोयाबीनसह इतर खरीप पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून शासनाच्या नियमानुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व आवश्यक आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली. 


शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, “सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना या संकटाच्या काळात वाऱ्यावर सोडले जाणार नाही. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे, नुकसानभरपाई आणि आवश्यक आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन तसेच शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.


 
Top