धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध शासकीय शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावे लागत आहेत. मात्र सध्या पोर्टलवर वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या तांत्रिक समस्या तातडीने दूर करून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाडीबीटी 2.0 पोर्टलवर अर्ज भरताना सर्व्हर डाऊन होणे, पोर्टल हँग होणे, व पासवर्डसंदर्भातील अडचणी, आवश्यक कागदपत्रे अपलोड न होणे तसेच अर्ज अंतिमरित्या सबमिट करताना तांत्रिक त्रुटी येणे अशा विविध समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा अर्ज वेळेत पूर्ण होत नसून, शिष्यवृत्तीच्या अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करता येईल की नाही, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या तांत्रिक अडचणींचा मोठा फटका बसत आहे. शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाची आर्थिक मदत असल्याने केवळ पोर्टलमधील तांत्रिक त्रुटींमुळे पात्र विद्यार्थी या लाभापासून वंचित राहू नयेत, अशी भूमिका डॉ. पाटील यांनी मांडली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभाग व महाडीबीटी प्रशासनाशी तातडीने संपर्क साधून पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कार्यवाही करावी. तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष हेल्पडेस्क सुरू करावा, तांत्रिक कारणांमुळे अर्ज भरता न आलेल्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्यावी आणि प्रलंबित किंवा अर्धवट अर्ज पूर्ण करण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करून विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज पूर्ण करून घेण्यात यावेत आणि पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेऊन प्रशासनाने या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी व्यक्त केली आहे.
