धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला असून, नुकसानीची शास्त्रीय व वस्तुनिष्ठ पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढून महसूल यंत्रणेला तातडीने पाहणी करून अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा जिल्हास्तरीय अहवाल आठवडाभरात अपेक्षित आहे.
पावसातील खंडामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांची सद्यस्थिती, झालेल्या नुकसानीची तीव्रता आणि संभाव्य उत्पादनातील घट याची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. नुकसानीचे प्रमाण 33 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्यास केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या निकषांनुसार नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तयार केल्या जाणाऱ्या या वस्तुनिष्ठ अहवालाला विशेष महत्त्व प्राप्त आहे.आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिल्याने खरीप नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल वेळेत शासनाकडे सादर होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
पीक कापणी प्रयोगासाठी जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात प्रत्येक पिकासाठी 12 प्लॉट निश्चित करण्यात आले आहेत. या प्लॉटची माहिती संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे. नुकसानग्रस्त पिकांची काढणी करताना या निश्चित केलेल्या प्लॉटचा विचार करणे आवश्यक आहे.निश्चित केलेल्या प्लॉटवरील पीक प्रयोगापूर्वीच काढून टाकल्यास संबंधित प्लॉटबाबत ‘निरंक' अशी नोंद होऊ शकते.
