धाराशिव (प्रतिनिधी)- प्राचीन लेणींमधून उलगडणारा हजारो वर्षांचा इतिहास, तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा,नळदुर्ग- परंड्यासारख्या भुईकोट किल्ल्यांचा दिमाख आणि तेरसारख्या प्राचीन नगरीचा सांस्कृतिक वारसा अशा इतिहास,अध्यात्म,संस्कृती आणि पर्यटनाच्या समृद्ध पदरांनी धाराशिव जिल्ह्याची ओळख घडली आहे.या वैभवशाली वारशाचे जतन करतानाच पर्यटक आणि भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील संरक्षित स्मारके व पर्यटनस्थळांच्या विकासाला आता नियोजनबद्ध चालना दिली जात आहे. जिल्ह्याच्या या पर्यटन- सांस्कृतिक वैभवाचा आलेखही अधोरेखित होत आहे.
धाराशिव हा मराठवाड्यातील प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा आहे.जिल्ह्याचे पूर्वीचे नाव ‘उस्मानाबाद' होते.प्राचीन काळापासून ‘धाराशिव' या नावाने हा भाग ओळखला जात असल्याचे अनेक शिलालेखांमधील उल्लेखांतून स्पष्ट होते.राष्ट्रकूट काळात सातव्या-आठव्या शतकात या परिसराला विशेष महत्त्व होते. जिल्ह्याचा बहुतांश भाग पठारी असून एकूण क्षेत्रफळ 7 हजार 512 चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी 241 चौरस किलोमीटर क्षेत्र शहरी आहे.हा ऐतिहासिक आणि भौगोलिक वारसाच जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी मोठी ताकद ठरत आहे.
धाराशिव लेणी, चामर (चांभार) लेणी, शिवगुरू समाधी मंदिर, हजरत समशुद्दीन दर्गा, तेर येथील त्रिविक्रम मंदिर, उत्तरेश्वर मंदिर, संत गोरोबा काकांचे घर आदी 29 स्मारकांत जिल्ह्याचा इतिहास दडला आहे. तुळजापूर, तेर, जागजी, माणकेश्वर, नळदुर्ग, परंडा, धाराशिव येथील धार्मिक तीर्थक्षेत्राबद्दल लोकांच्या मनात श्रध्दा आहे. त्यामुळे पर्यटनाची नवीन संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे 14 कोटी 34 लाख रूपयांच्या या भागातील विकास कामावर खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

