धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश,कर्नाटक, तेलंगणा व इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक तुळजापुरात येतात.देवीची सिंहासन पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते.या पूजेसाठी भाविकांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने संधी मिळावी, यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने ऑक्टोबर 2026 या महिन्यातील सिंहासन पूजेच्या नोंदणी व ऑनलाइन सोडतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नोंदणीला 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.
भाविकांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश करून सिंहासन पूजेसाठी ऑनलाइन नोंदणी करावी,असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑक्टोबर 2026 महिन्याच्या सिंहासन पूजेच्या नोंदणीसाठी वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सिंहासन पूजेची ऑनलाइन नोंदणी 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होऊन 24 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन ड्रॉ पद्धतीने प्रथम सोडत काढण्यात येऊन भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस पाठविण्यात येईल.प्रथम सोडतीत निवड झालेल्या भाविकांना 27 सप्टेंबर सकाळी 11 ते 28 सप्टेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत ऑनलाइन पेमेंट करता येईल.
प्रथम सोडतीनंतरही सिंहासन पूजेची संख्या पूर्ण न झाल्यास 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन ड्रॉ पद्धतीने द्वितीय सोडत काढण्यात येईल आणि संबंधित भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस पाठविला जाईल. द्वितीय सोडतीतील भाविकांना 28 सप्टेंबर सकाळी 11 ते 29 सप्टेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे.
प्रथम, द्वितीय सोडतीनंतरही पूजेची संख्या पूर्ण न झाल्यास 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता तृतीय ऑनलाइन सोडत काढण्यात येईल आणि भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस पाठविण्यात येईल. तृतीय सोडतीत निवड झालेल्या भाविकांना 29 सप्टेंबर सकाळी 11 ते 30 सप्टेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत ऑनलाइन पेमेंट करण्याची मुदत असेल.त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता ऑक्टोबर 2026 महिन्यातील अंतिम सिंहासन पूजा बुकिंग झाल्याची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
‘या' कालावधीत सिंहासन पूजा राहणार बंद
भाविकांनी जाहीर वेळापत्रकानुसार सिंहासन पूजेची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने केले आहे.तसेच 4 ते 10 ऑक्टोबर 2026 आणि 21 ते 25 ऑक्टोबर 2026 या कालावधीत श्री देवीजींची मंचकी निद्रा असल्याने सिंहासन पूजा बंद राहणार आहे,याची भाविकांनी नोंद घ्यावी.श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक (प्रशासन) यांनी भाविकांना निर्धारित वेळेत ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.