तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पंचक्रोशीतील मराठा समाज बांधव, महिला व भगिनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आंदोलनामुळे तुळजापूर-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

आंदोलनाच्या सुरुवातीला मंडल अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी तहसीलदारांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका घेतली. त्यानंतर तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. मराठा समाजाच्या मागण्या शासनाच्या संबंधित विभागापर्यंत पोहोचवून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले.

मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. 58 लाख मराठा-कुणबी नोंदींच्या आधारे पात्र लाभार्थ्यांना तात्काळ प्रमाणपत्रे देण्यात यावीत, तसेच हैदराबाद गॅझेटनुसार पात्र मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ व तातडीने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान समाजातील बांधवांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेऊन रद्द करण्यात यावेत. भारतीय संविधानाच्या चौकटीत आणि 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला तात्काळ देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. याशिवाय सातारा, कोल्हापूर, औंध संस्थानांचे गॅझेट तसेच बॉम्बे गॅझेटबाबत तात्काळ शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी करावी. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करून पात्र वारसांना तात्काळ नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक हिताच्या या मागण्या न्याय्य असून शासनाने त्यांची तात्काळ दखल घ्यावी. संबंधित मागण्या शासनाच्या विभागांकडे पाठवून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची शिफारस करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनात पंचक्रोशीतील मराठा समाज बांधव, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मनोज माडजे, बप्पा नावडे, महादेव मोरे, डॉ. विश्वजीत छित्रे, धीरज जाधव, बाळासाहेब जाधव, उमेश मोरे, जयकुमार माडजे, बळवंत माडजे, दादा मोरे, शशिकांत मोरे, सचिन सोमवंशी आदींसह मराठा समाज बांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या.


 
Top