धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदी भाषा भारतीय अस्मितेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन डॉ. केशव क्षीरसागर यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात हिंदी विभागात दि.14 ते 28 सप्टेंबर 2026 या कालावधीत वक्तृत्व, निबंध, काव्यवाचन, जाहिरात लेखन, राष्ट्रभक्ती गीत गायन इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
हिंदी पंधरवडा संवाद मंचावर संवाद साधताना डॉ केशव क्षीरसागर बोलत होते. डॉ. क्षीरसागर म्हणाले की, हिंदी भाषेमुळे प्रादेशिक संस्कृती, परंपरा एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. भारतामध्ये किंबहुना विश्वामध्ये द्वितीय क्रमांकावर बोलल्या जाणाऱ्या भाषेमुळे भारत आणि भारताच्या बाहेर हिंदी भाषेमुळे अनेक रोजगार निर्माण होत आहेत. भाषा संवादाचे माध्यम आहे, संघर्षाचे नाही असे ते म्हणाले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला. कार्यक्रमाचे आभार डॉ.शितल गायकवाड यांनी मानले.
