तुळजापूर (प्रतिनिधी)-  जगभरातील अस्थिर वातावरण, वाढती महागाई, पावसाने दिलेली ओढ आणि पारंपरिक व्यवसायासमोरील वाढत्या अडचणींमुळे विघ्नहर्ता गणरायाच्या मूर्ती घडवणारे कुंभार कारागीर आज गंभीर संकटात सापडले आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याने आणि व्यवसाय टिकवण्यासाठी कोणताही आधार नसल्याने “आम्हाला वालीच नाही,“ अशी व्यथा तुळजापूर तालुक्यातील ज्येष्ठ मूर्तिकार लक्ष्मण सिदलिंग कुंभार यांनी व्यक्त केली.

हैदराबादसह राज्यातील आणि परराज्यातील अनेक भागांमध्ये आपल्या कलात्मक गणेशमूर्तींची ओळख निर्माण करणारे लक्ष्मण कुंभार हे ग्रामीण भागातील पारंपरिक मूर्तिकार आहेत. त्यांच्या घराण्यातील चौथी पिढी या व्यवसायात कार्यरत असून, घरातील सात सदस्य दिवस-रात्र मेहनत घेऊन गणेशमूर्ती तयार करतात. मात्र काळाच्या ओघात या व्यवसायासमोरील अडचणी वाढतच गेल्या असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी मोठ्या प्रमाणात मातीच्या मूर्ती तयार केल्या जात होत्या. मात्र वाढती लोकसंख्या आणि वाढलेली मागणी यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींचा वापर वाढला. मातीच्या मूर्ती तयार करण्यासाठी अधिक वेळ, मेहनत आणि खर्च लागतो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरील मागणी पूर्ण करणेही कठीण ठरते. आता पीओपीवर निर्बंध आल्याने पारंपरिक कारागिरांपुढे नवीन संकट उभे ठाकले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुंभार समाजाला साडेसातशे ब्रास माती उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप त्यासंदर्भातील परिपत्रकच जारी झालेले नसल्याने अंमलबजावणीचा प्रश्न दूरच असल्याची नाराजी कारागिरांमध्ये आहे.


हजारो मूर्तींच्या ऑर्डर; पण भविष्याची धास्ती

सध्या हैदराबादसह महाराष्ट्र आणि परराज्यातील अनेक गावांतून हजारो गणेशमूर्तींच्या ऑर्डर आल्या आहेत. मार्च महिन्यापासून मूर्ती तयार करण्याचे काम सुरू झाले असून, आता रंगरंगोटीचा टप्पा सुरू होणार आहे. यंदा 14 सप्टेंबर रोजी गणेश प्रतिष्ठापना असल्याने कारागिरांची लगबग वाढली आहे.मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी, इंधनाच्या किमतीतील चढ-उतार आणि संभाव्य टंचाई यामुळे चिंता वाढली आहे. जर परिस्थिती आणखी बिघडली आणि इंधनाचा तुटवडा निर्माण झाला, तर तयार केलेल्या हजारो मूर्तींचे काय करायचे? असा प्रश्न लक्ष्मण कुंभार यांनी उपस्थित केला.


 
Top