वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील पिंपळगाव कमळेश्वर येथील गणेश कल्याण वत्रे यांची नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकपदी, तर प्रियंका आकाश जोगदंड यांची भंडारा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल धाराशिव जिल्हा परिषदेच्या पारगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता विकास तळेकर यांच्या वतीने तसेच शिवसेना परिवार, वाशी तालुका यांच्या वतीने दोन्ही नवनिर्वाचित शिक्षकांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी गणेश कल्याण वत्रे व प्रियंका आकाश जोगदंड यांना पुष्पगुच्छ देऊन तसेच शाल व श्रीफळ अर्पण करून त्यांचा गौरव करण्यात आला. कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता विकास तळेकर यांनी नवनिर्वाचित शिक्षकांचे अभिनंदन करताना सांगितले की, “शिक्षक हा समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देतानाच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणे ही शिक्षकांची मोठी जबाबदारी आहे. आपल्या कार्यातून विद्यार्थ्यांचे आणि समाजाचे भविष्य घडवावे,” असे आवाहन केले.
पिंपळगाव कमळेश्वर येथील दोन्ही गुणवंतांची जिल्हा परिषद शिक्षक म्हणून निवड झाल्याने गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थी व युवकांना स्पर्धा परीक्षांसह विविध क्षेत्रांत यश मिळविण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले. या सत्कार समारंभास सौ. सविता विकास तळेकर, जिल्हा परिषद सदस्या, धाराशिव पारगाव गट, विकास भगवान तळेकर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी, पोपट सुरवसे, राजू कोळी, समाधान मोटे, महेश कोकणे यांच्यासह शिवसेना परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
